जामखेड पाणीपुरवठा योजना अंतर्गत दहिगाव येथे पाइपलाईन कामाची पाहणीदहिगाव येथे जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या कामाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

जामखेड पाणीपुरवठा योजना सध्या वेगाने पुढे जात असून, दिवाळी 2027 पर्यंत शहराला उजनी धरणातून स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी याबाबत माहिती देत प्रकल्पाच्या कामाला गती मिळाल्याचे सांगितले.

जामखेड शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उजनी (दहिगाव) ते जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या कामांना सध्या वेग आला आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामांची सातत्याने पाहणी केली जात असून उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दहिगाव परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाइपलाईन टाकण्याच्या उर्वरित जागांवरील अडचणी समजून घेण्यासाठी स्थानिक शेतकरी बंधू व माताभगिनींशी संवाद साधण्यात आला. शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने प्रकल्पाला अधिक वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या योजनेअंतर्गत सुमारे 66 किलोमीटर लांबीची पाइपलाईन टाकण्यात येत असून त्यापैकी 55 किमी काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 11 किमी कामांमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या लवकर दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

सुमारे 250 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणारी ही योजना जामखेड शहरासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकल्पात जलशुद्धीकरण केंद्र, पाणी साठवण टाक्या आणि वितरण व्यवस्था उभारण्याचे कामही सुरू आहे.

पाइपलाईन टाकण्याच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने प्रकल्प लवकर पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून सुरू झालेली ही योजना तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. करमाळा तालुक्यातील दहिगाव येथील उजनी धरण बॅकवॉटरमधून जामखेड शहरासाठी पाणी आणण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि भविष्यातील पाणी गरजांचा विचार करून ही योजना राबविण्यात येत आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर जामखेड शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून नागरिकांना नियमित, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

या पाहणीवेळी नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, जया संतोष गव्हाळे (सभापती, महिला व बाल कल्याण समिती), उपसभापती सीमा रवींद्र कुलकर्णी, मोहन सिताराम पवार (सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती), वैशाली अर्जुन म्हेत्रे (सभापती, स्वच्छता व आरोग्य समिती), श्रीराम अजिनाथ डोके (सभापती, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती),नगरसेवक प्रा .विकी घायतडक यांच्यासह मुख्याधिकारी अजय साळवे, गटनेते तात्याराम पोकळे, संजय काशीद, पवन राळेभात, प्रविण चोरडिया, अमित चिंतामणी, संतोष गव्हाळे, सागर टकले, मनोज कुलकर्णी, पाणीपुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर मिसाळ, प्राधिकरणाचे अधिकारी राजेंद्र चौधरी, अनिल चव्हाण तसेच ठेकेदार इगल इंजिनिअरिंगचे अनिल गुरुबकसानी व इतर अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!