घणसोलीतील अनधिकृत रविवार बाजारावर महापालिकेचा बुलडोझर; कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश:
कारवाई फक्त एका दिवसापुरती नको ,अतिक्रमण कायमचे हटवा -नगरसेवक गणेश सकपाळ
नवी मुंबई | प्रतिनिधी
वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणामुळे महापालिकेची धडक कारवाई
घणसोली गावात अनेक वर्षांपासून भरत असलेल्या अनधिकृत रविवार (आठवडे) बाजारावर अखेर नवी मुंबई महानगरपालिकेने धडक कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. वाहतूक कोंडी, पदपथावरील अतिक्रमण, पादचाऱ्यांची गैरसोय तसेच आपत्कालीन सेवांना होणारा अडथळा लक्षात घेऊन हा अनधिकृत रविवार बाजार कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

नगरसेवक, महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई
स्थानिक नगरसेवक गणेश सकपाळ, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यावेळी अनधिकृत स्टॉल, हातगाड्या, फेरीवाले आणि रस्त्यावर उभारलेली इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. नागरिकांनी ही कारवाई कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी केली.

२,५०० ते ३,००० अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाढली वाहतूक कोंडी
महापालिकेच्या ‘एफ’ परिमंडळाचे सहाय्यक आयुक्त वसंत मुंडावरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बाजार पुन्हा भरू न देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. घणसोली नोड व गावठाण परिसरात सुमारे २,५०० ते ३,००० अनधिकृत फेरीवाले रस्ते, पदपथ आणि गटारांवर व्यवसाय करत असल्याने वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

एनएमएमटी बस क्रमांक ८ च्या सेवेलाही बसला फटका
घणसोली नाका ते श्री हनुमान मंदिर मार्गावरील अतिक्रमणामुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे. याचा थेट परिणाम एनएमएमटी बस क्रमांक ८ च्या सेवेला झाला असून, बससेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
‘आठवडे बाजारास बंदी’चे फलक; जागामालकांनाही इशारा
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार घणसोली गावातील दगडू चाहू पाटील चौकात “आठवडे बाजारास बंदी”चे फलक लावण्यात आले आहेत. खासगी जागेवर परवानगीशिवाय बाजार भरविणाऱ्या जागामालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी स्पष्ट केले.
कारवाईत अडथळा आणल्यास BNS अंतर्गत गुन्हा
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. अनधिकृत बाजार पुन्हा भरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांचे स्वागत; फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम
महापालिकेच्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले असून, वाहतूक कोंडी कमी होऊन रस्ते मोकळे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, या बाजारावर उपजीविका अवलंबून असलेल्या फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही आता महत्त्वाचा ठरणार आहे.

https://lokbhavanmarathinews.com
https://student.maharashtra.gov.in

