मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील संभाव्य दुर्घटना टाळणाऱ्या तीन तरुणांचा अमित ठाकरे यांच्या हस्ते गौरवमुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील संभाव्य दुर्घटना टाळणाऱ्या तीन तरुणांचा अमित ठाकरे यांच्या हस्ते गौरव

नवी मुंबई | प्रतिनिधी

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्याजवळ दरड कोसळण्याची शक्यता लक्षात येताच नवी मुंबईतील संदेश खरात, अक्षय लांडगे आणि रोशन सरगर या तीन तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली होती. तिघांनी तत्काळ तेथील इमर्जन्सी बटण दाबून नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्याचबरोबर मागून येणारी वाहने थांबवत अनेक प्रवाशांचे प्राण वाचविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे यांनी संदेश खरात, अक्षय लांडगे आणि रोशन सरगर यांची भेट घेऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या धाडसाचे, सतर्कतेचे आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेचे त्यांनी मनापासून कौतुक केले. यावेळी मनसे नेते गजानन काळे, नगरसेवक अभिजित देसाई तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अमित ठाकरे यांनी तिन्ही तरुणांशी संवाद साधत संकटाच्या क्षणी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि नागरिक म्हणून पार पाडलेले कर्तव्य हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अशा जबाबदार नागरिकांमुळे अनेकांचे जीव वाचू शकतात आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांनीही तिन्ही तरुणांचे अभिनंदन केले. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता प्रसंगावधान राखावे, तत्काळ संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी आणि जबाबदारीने वागावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील या घटनेमुळे संदेश खरात, अक्षय लांडगे आणि रोशन सरगर यांच्या धाडसाची आणि सामाजिक बांधिलकीची राज्यभर चर्चा होत आहे. त्यांच्या योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून, संकटाच्या वेळी जागरूक आणि जबाबदार नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची असते, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. त्यांच्या या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, समाजासाठी त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!