नवी मुंबई मनसेकडून नेरुळ विद्युत दुर्घटनेतील ‘देवदूत’ प्रवीण महाले यांचा सन्मान
नवी मुंबई (प्रतिनिधी)
नेरुळमध्ये विजेच्या धक्क्याची धक्कादायक घटना
नेरुळ एल.पी. नाका पुलाखाली १ जुलै २०२६ रोजी घडलेल्या विद्युत दुर्घटनेत दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसून त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. पावसाच्या पाण्याशी विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचा संपर्क आल्याने हा अपघात घडल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली होती.
विद्यार्थिनींवर उपचार; अधिकाऱ्याचे निलंबन
घटनेनंतर नागरिकांच्या मदतीने दोन्ही विद्यार्थिनींना तातडीने डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचार व निगराणीसाठी त्यांना फोर्टिस रुग्णालय, वाशी येथे हलविण्यात आले असून दोघींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रथमदर्शनी विद्युत विभागाचा हलगर्जीपणा आढळून आल्याने कार्यकारी अभियंता (विद्युत) प्रवीण हिंदूराव गाडे यांना निलंबित करण्यात आले असून घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

कारवाईच्या मागणीसाठी मनसेचे आयुक्त कार्यालयावर आंदोलन
या दुर्घटनेनंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, निष्काळजी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले होते. मनसेने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्यात आले.

जीवाची पर्वा न करता विद्यार्थिनींना दिला जीवदान
या संपूर्ण घटनेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते रिक्षाचालक प्रवीण महाले यांच्या धाडसी कृतीने. अनेकजण भीतीपोटी दूर उभे राहिले असताना त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत दोन्ही विद्यार्थिनींना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मनसेकडून ‘देवदूत’ प्रवीण महाले यांचा सन्मान
या धाडसी कार्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबईच्या वतीने रिक्षाचालक प्रवीण महाले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मनसे नेते गजानन काळे तसेच मनसे नगरसेवक अभिजित देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

मानवतेचा आदर्श ठरलेले धाडस
संकटाच्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन विद्यार्थिनींचे प्राण वाचवणारे प्रवीण महाले हे खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या धाडसाला उपस्थितांनी सलाम करत अशा कर्तव्यदक्ष नागरिकांचा सन्मान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

https://lokbhavanmarathinews.com
https://student.maharashtra.gov.in

