नेरूळ रेल्वे स्थानकाच्या दुरावस्थेबाबत मनसेचे स्टेशन प्रबंधकांना निवेदन; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
नवी मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबईच्या वतीने नेरूळ रेल्वे स्थानकावरील विविध गंभीर समस्या आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या गैरसोयींबाबत आज स्टेशन प्रबंधक (Station Manager) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले. नेरूळ रेल्वे स्थानक हे नवी मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून, गेल्या काही महिन्यांपासून येथील मूलभूत सुविधांचा अभाव आणि देखभालीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मनसेने प्रशासनासमोर मांडलेल्या प्रमुख समस्यांमध्ये पावसाळ्यात छतामधून होणारी पाणीगळती, प्लॅटफॉर्मवर साचणारे पाणी व त्यामुळे वाढणारा अपघाताचा धोका, नियमित स्वच्छतेचा अभाव, कचऱ्याचे ढीग, शौचालयांची अत्यंत दयनीय अवस्था, बंद पडलेले एस्केलेटर व लिफ्ट, अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाढणारी गर्दी तसेच पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या सुविधा यांचा समावेश आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, रुग्ण आणि गरोदर महिलांना बंद एस्केलेटर व लिफ्टमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले. तसेच रेल्वे प्रशासनाने स्थानकाची सुरक्षा वाढवून छताची दुरुस्ती, नियमित स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू करणे आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक” श्री. अभिजीत अनंत देसाई (नवी मुंबई महानगरपालिका) यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
या प्रसंगी उपशहर प्रमुख श्री. सविनय म्हात्रे, विभाग सचिव श्री. अर्जुन मोहन चव्हाण, उपविभाग अध्यक्ष श्री. अक्षय वाघोले, श्री. संतोष सातपुते, श्री. अजय थारकर, श्री. सचिन सणस आणि श्री. विजेंद्र म्हात्रे उपस्थित होते.
मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रवाशांच्या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर प्रवाशांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

https://lokbhavanmarathinews.com
https://student.maharashtra.gov.in

