पहिल्याच दिवशी गरीब विद्यार्थी गणवेशाविना;मनसे-उद्धव सेनेचे मनपा मुख्यालयात जोरदार आंदोलन!
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे सत्ताधाऱ्यांचे व प्रशासनाचे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही पालिकेच्या शाळांमधील हजारो गरीब विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत बसल्याची अत्यंत संतापजनक बाब समोर आली आहे. या ढिसाळ कारभाराचा आणि सत्ताधाऱ्यांच्या जनविरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने नवी मुंबई मनपा मुख्यालयात संयुक्तपणे जोरदार आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व मनसे नगरसेवक मा. श्री. अभिजीत अनंत देसाई, शिवसेना गटनेते मा. श्री. विशाल ससाणे, नगरसेवक मा. श्री. विशाल विचारे, जिल्हाप्रमुख मा. श्री. प्रकाश पाटील, मा. श्री. प्रवीण म्हात्रे आणि उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे मनविसे शहर अध्यक्ष मा. श्री. संदेश डोंगरे यांनी केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला...

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रभाग २२ चे नगरसेवक अभिजीत देसाई यांनी स्वतः अनेक शाळांना भेटी देऊन पाहणी केली असता, एकाही विद्यार्थ्याला गणवेश अथवा शैक्षणिक साहित्य मिळाले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

यावर तीव्र संताप व्यक्त करताना नगरसेवक अभिजीत देसाई म्हणाले: “आम्ही महासभेत सातत्याने मागणी केली होती की, गणवेश शिवण्याचे हे काम स्थानिक महिला बचत गटांना द्यावे. यामुळे नवी मुंबईतील शेकडो गरजू भगिनींना हक्काचा रोजगार मिळाला असता. परंतु, ‘बचत गट वेळेत काम पूर्ण करणार नाहीत’ असे खोटे आणि पळपुटे कारण देत सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने संगनमताने हे कोट्यवधींचे कंत्राट एका मोठ्या खाजगी कंपनीच्या घशात घातले.
आज शाळा सुरू होऊनही मुलांच्या हातात गणवेश नाही. जर हेच काम स्थानिक महिला बचत गटांना दिले असते, तर त्यांनी रात्रीचा दिवस करून पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात मानाने गणवेश सुपूर्द केले असते. सत्ताधाऱ्यांच्या या हट्टी आणि स्वार्थी भूमिकेमुळे महिलांचा हक्काचा रोजगारही बुडाला आणि गरिबांची मुलेही पहिल्या दिवशी गणवेशाविना शाळेत बसली.”

या आंदोलनादरम्यान लोकप्रतिनिधींनी मनपा महासभेत सुरू असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या निरर्थक राजकारणावर कडाडून टीका केली. सध्या संपूर्ण नवी मुंबईत पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे, नागरिकांना वाढीव वीज बिलांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे, आणि दुसरीकडे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर महासभेत सखोल चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, हे मुख्य प्रश्न बाजूला सारून, महापालिकेच्या एका उद्घाटन पत्रिकेवर नेत्याचे नाव का नाही, याच एका क्षुल्लक आणि निरर्थक विषयावर सत्ताधाऱ्यांनी महासभेचा अमूल्य वेळ विनाकारण वाया घालवला. जनतेच्या मूलभूत प्रश्नांशी सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला काहीही देणेघेणे उरलेले नाही, हेच यावरून स्पष्ट होते, असा टोला नगरसेवक देसाई व सहकारी लोकप्रतिनिधींनी लगावला.
या आंदोलनात सविनय म्हात्रे, श्रीकांत माने, अतुल कुलकर्णी, अभिजित देसाई यांच्यासह मनसे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

https://lokbhavanmarathinews.com
https://student.maharashtra.gov.in

