साकत येथे विजेच्या तुटलेल्या तारेला चिटकून दोन बैलांचा मृत्यू; पाच जण थोडक्यात बचावले
शेतकरी संभाजी वराट यांना मदतीची अपेक्षा
साकत | प्रतिनिधी-सुनिल पुलवळे
साकत येथे विजेच्या तुटलेल्या तारेला चिटकून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २५) दुपारी घडली. या दुर्दैवी दुर्घटनेत बैलगाडीत बसलेले पाच जण थोडक्यात बचावले असून, शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पेरणीपूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी नवनाथ वराट हे शेती मशागतीच्या कामासाठी बैलगाडी घेऊन साकत येथून कडभनवाडी येथील बारले शिवाराकडे जात होते. त्यांच्यासोबत बैलगाडीत शहाजी महादेव वराट, संगीता शहादेव वराट, सोहम संभाजी वराट आणि एकनाथ नारायण वराट हे देखील प्रवास करत होते. शेतीच्या कामासाठी जात असताना अचानक रस्त्यावर पडलेल्या तुटलेल्या विजेच्या तारेला बैलांचा स्पर्श झाला आणि काही क्षणातच दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला.

साकत येथे विजेच्या तुटलेल्या तारेला चिटकून दोन बैलांचा मृत्यू कसा झाला?
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेची तार काही काळापासून तुटलेल्या अवस्थेत खाली पडलेली होती. बैलगाडी पुढे जात असताना बैलांचा त्या तारेशी संपर्क आला. जोरदार विद्युतप्रवाहामुळे दोन्ही बैल खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सुदैवाने बैलगाडीला टायरची चाके असल्यामुळे विद्युतप्रवाह गाडीत पोहोचला नाही. त्यामुळे बैलगाडीत बसलेले पाचही जण मोठ्या दुर्घटनेतून बचावले. ही घटना पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

१ लाख ५० हजारांचे नुकसान; शेतकरी संकटात
या दुर्घटनेत मृत झालेल्या बैलांची बाजारभावानुसार किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असताना बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकरी संभाजी वराट यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
“पेरणी तोंडावर आली असताना बैल गेले. आता नांगरणी आणि मोगडा पाळी कशी करायची? शासनाने तातडीने मदत द्यावी,” अशी भावनिक प्रतिक्रिया संभाजी वराट यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात अजूनही अनेक शेतकरी शेतीसाठी बैलांवर अवलंबून असल्याने अशा दुर्घटनांचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Ads

महावितरण आणि पशुवैद्यकीय विभागाचा पंचनामा
घटनेची माहिती मिळताच आज दि. २६ रोजी महावितरणचे वायरमन सावंत तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मोटेगावकर, पशुवैद्यकीय अधिकारी अनभुले आणि डॉ. राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी मृत बैलांचा पंचनामा करून घटनेची नोंद केली.
यावेळी साकत गावचे माजी उपसरपंच राजाभाऊ वराट, माजी सभापती संजय वराट सर, विठ्ठल वराट, ग्रामसेवक शिंदे, शहादेव वराट, महादेव वराट (पोलीस पाटील) आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
महावितरणचे अभियंता शिंदे यांनी सांगितले की, शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तुटलेल्या वीजतारा वेळेवर दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांकडून संताप व्यक्त
या घटनेनंतर साकत परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. वेळेत तारा दुरुस्त केल्या असत्या तर दोन निरपराध बैलांचा जीव गेला नसता, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजतारा झुकलेल्या अवस्थेत असल्याने मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि जनावरांचे जीव वाचवण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://lokbhavanmarathinews.com
https://student.maharashtra.gov.in
आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉईन करा!
ताज्या बातम्या, अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/IzwBnqzWnkR7kRoot9djA9

