दिघोळ श्री हनुमान विद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभा; शाळा विकासासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चार वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी मदतीची घोषणा; शिक्षक-पालक सहविचार सभेत महत्त्वपूर्ण निर्णय
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थांचा सहभाग
दिघोळ परिसरातील यशवंत शिक्षण संस्थेच्या श्री हनुमान विद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभा शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय (भाऊ) अभिमान गीते होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष शहाजी (काका) गीते, उपसरपंच दशरथ राजगुरू, तंटामुक्ती अध्यक्ष धीरज रसाळ, संतोष गीते तसेच शिक्षणाबद्दल नेहमी तळमळ असणाऱ्या गीते बाई उपस्थित होत्या.

कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माऊली निर्मळ तसेच समिती सदस्य हनुमंत खुणे, बाळासाहेब दगडे, परमेश्वर तागड, दत्तात्रय विधाते, माजी उपसरपंच बळीराम तागड, नागराज उमाप, पैलवान वसंत रसाळ, अंकुश शिंदे, संतोष तागड आणि माळेवाडीचे रामहरी राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोडे सर यांनी केले, तर प्रास्ताविक गायकवाड सर यांनी मांडले.
शिक्षक-पालक सहविचार सभेत शाळेच्या विकासावर सविस्तर चर्चा
प्रास्ताविकामध्ये गायकवाड सर यांनी शाळेमध्ये सुरू असलेल्या चार नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाची सद्यस्थिती ग्रामस्थांसमोर मांडली. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता शाळेच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी गावकऱ्यांनी व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या शिक्षक-पालक सहविचार सभेत ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी मोठ्या उत्साहाने पुढाकार घेतला. शाळेच्या नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी किमान 1000 गोणी सिमेंट उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांनी मांडला. तसेच गावातील एसएससीच्या विविध बॅचनुसार माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक व साहित्य स्वरूपात मदत करावी अशीही सूचना सभेत करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माऊली निर्मळ यांनी शाळेच्या विकासासाठी 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली, तर समितीच्या इतर सदस्यांनी प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. ग्रामस्थ आणि पालकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे शाळेच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा
सभेमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, गुणवत्ता वाढविणे, विविध स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांची गैरहजेरी कमी करणे, पटसंख्या वाढविणे तसेच बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गावातील शाळेतच प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन देणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी काही पालकांनी आपली मते व्यक्त करताना शिक्षक आणि पालक यांच्यातील समन्वय वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शाळेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असेही मत व्यक्त करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात दत्तात्रय (भाऊ) गीते यांनी शाळेला मदत करण्यासाठी सुजाण पालकांचा एक विशेष ग्रुप तयार करण्यात आल्याची माहिती दिली. या ग्रुपच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना शाळेसाठी आर्थिक मदत जाहीर करायची आहे त्यांनी ती जाहीर करावी, असे आवाहन त्यांनी केले. या ग्रुपवर आतापर्यंत सुमारे 51 हजार रुपयांची मदत जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच पालकांपैकी शहाजी ( काका) गीते व गीते बाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे शिक्षक दहिफळे सर यांनी सर्व उपस्थित पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांचे आभार मानले.
“शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान” या भावनेतून पार पडलेली शिक्षक-पालक सहविचार सभा शाळेच्या प्रगतीसाठी एक सकारात्मक पाऊल ठरली.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत” – सभापती राम शिंदे; IPS निखिल तांबे यांचा अरणगावमध्ये नागरी सत्कार https://lokbhavanmarathinews.com/1127/ram-shinde/


