ICC Under 19 World Cup 2026 Final India vs England – Team India CelebrationICC Under 19 World Cup 2026 Final India vs England: भारताचा सहावा विश्वविजय

ICC Under 19 World Cup 2026 Final India vs England हा सामना भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. आयसीसी पुरुष 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 चा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवण्यात आला. मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सलामीवीर आरोन जॉर्ज लवकर बाद झाला, मात्र त्यानंतर भारताने सामन्यावर पकड मजबूत केली. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी दुसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी करत संघाची धावसंख्या वेगाने वाढवली.

वैभव सूर्यवंशीच्या 175 धावा : या सामन्यात भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियानं 20 धावांवर सलामीवीर आरोन जॉर्ज (9) चा बळी गमावला. त्यानंतर, वैभव सूर्यवंशीनं कर्णधार म्हात्रेसह 90 चेंडूत दुसऱ्या विकेटसाठी 142 धावा जोडल्या आणि संघाला 162 धावांपर्यंत पोहोचवलं. म्हात्रे 51 चेंडूत 53 धावा काढून बाद झाला, ज्यामध्ये दोन षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. वैभव सूर्यवंशीनं आपली स्फोटक फलंदाजी सुरुच ठेवली, त्यानं फक्त 55 चेंडूत शतक झळकावलं. 175 धावा काढल्यानंतर तो बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 15 चौकार आणि 15 षटकार मारले. 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात कोणत्याही फलंदाजानं केलेली ही सर्वोच्च खेळी आहे. यासह, त्यानं युवा वनडे सामन्यात 100वा षटकारही ठोकला. वैभव हा असा पराक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे.

भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 412 धावांचा डोंगर उभा केला. आयुष म्हात्रेने 53 धावांची जबाबदार खेळी केली. शेवटच्या षटकांत कनिष्क चौहानने नाबाद 37 धावा करत संघाला 400 च्या पुढे नेले.
इंग्लंडकडून जेम्स मिंटनने तीन विकेट घेतल्या, तर सेबॅस्टियन मॉर्गन आणि अ‍ॅलेक्स ग्रीन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

412 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने आक्रमक सुरुवात केली. बेन डॉकिन्स आणि बेन मेयेस यांनी धावगती वाढवली, मात्र भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी विकेट्स घेतल्या.
20 षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या 171/3 होती, पण पुढील काही षटकांत भारताने चार झटपट बळी घेत सामन्याचे पारडे फिरवले.

इंग्लंडकडून कालेब फॉकनरने 67 चेंडूत 115 धावांची झुंजार खेळी केली. त्याने अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्याची ही झुंज अपुरी ठरली. अखेर इंग्लंडचा संघ 40.2 षटकांत 311 धावांवर सर्वबाद झाला.

या विजयासह भारताने सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला. याआधी भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये विजेतेपद पटकावले होते.
या कामगिरीमुळे भारत हा अंडर-19 विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे.

अधिक माहितीसाठी ICC Official Website → icc-cricket.com

ICC अंडर-19 विश्वचषक 2026 जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. भारताची क्रिकेट प्रतिभा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर उजळून निघाल्याचे त्यांनी म्हटले.

संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अत्यंत उत्कृष्ट, शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर करत आपले कौशल्य सिद्ध केले आहे. हा ऐतिहासिक विजय अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. तसेच, सर्व खेळाडूंना त्यांच्या पुढील क्रिकेट वाटचालीसाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. हा भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विरार आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण असून, विरारचा सुपुत्र आयुष म्हात्रे यांच्या कर्णधारपदाखाली संघाने जिद्द, शिस्त आणि अढळ निर्धाराचे अप्रतिम दर्शन घडवले, असे फडणवीस यांनी नमूद केले. अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी यांची 80 चेंडूत 175 धावांची अविस्मरणीय खेळी विशेष उल्लेखनीय असून, ही कामगिरी या विजयाचा सुवर्णक्षण म्हणून कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी सांगितले.

या युवा खेळाडूंनी केवळ विश्वचषक जिंकला नाही, तर आपल्या दमदार कामगिरीने संपूर्ण देशाची मनेही जिंकली आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!