सामाजिक कार्यकर्ते श्री. अमोल पुलवळे यांच्या पुढाकारातून साकत येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादसामाजिक कार्यकर्ते श्री. अमोल पुलवळे यांच्या पुढाकारातून साकत येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न प्रतिष्ठान, पाटोदा आणि पुण्यातील प्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते श्री. अमोल विठ्ठल पुलवळे यांच्या पुढाकारातून साकत येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत साकत ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे शिबिर पार पडले.

या शिबिराचे उद्घाटन ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. अशा प्रकारचे सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम गावासाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी असून या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी श्री. अमोल पुलवळे यांचे विशेष कौतुक केले.

या शिबिरास मा. संजय वराट सर यांनी भेट देऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व आहे. या शिबिरामुळे अनेकांना मोफत नेत्र तपासणीसह आवश्यक आरोग्य मार्गदर्शनाचा लाभ मिळाला असून ग्रामस्थांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाधानकारक आहे. निरोगी समाजाच्या उभारणीसाठी आरोग्यविषयक जनजागृती आणि सेवाभावी उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंचायत समितीचे माजी सभापती भगवान मुरूमकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांसारखे उपक्रम ग्रामीण जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. समाजहिताचा विचार करून सातत्याने कार्य करणारे अमोल पुलवळे यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबिरामध्ये एकूण १९० नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६५ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले, तर ३५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. या रुग्णांची पुढील टप्प्यात पुणे येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या अशाच नेत्र तपासणी शिबिरामध्ये १७५ नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी ४० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले होते, तर १० रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, या रुग्णांच्या साकत ते पुणे प्रवासाचा ये-जा खर्चही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आला होता.

सामाजिक कार्यकर्ते श्री. अमोल विठ्ठल पुलवळे हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, गावकऱ्यांसाठी वेळोवेळी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन, गावातील दिंडी सोहळा, सप्ताह, यात्रा आणि कुस्ती हंगामासाठी उत्स्फूर्त सहभाग व आर्थिक मदत अशा विविध माध्यमांतून ते समाजसेवा करत आहेत. तसेच गावातील स्मशानभूमी परिसरात वृक्षलागवड व त्याच्या संगोपनासाठी त्यांनी आर्थिक सहकार्य केले असून त्यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या मोफत नेत्र तपासणी शिबिरास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यामध्ये माजी सभापती संजय वराट सर, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, साकत गावचे सरपंच भाऊराव पाटील मुरूमकर, उपसरपंच राजभाऊ वराट, माजी सरपंच हरिभाऊ मुरूमकर, सदाशिव वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास वराट, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल वराट, युवा नेते नागराज मुरूमकर, ॲड. संपतलाल पुलवळे, युवा नेते अजित वराट तसेच सचिन वराट सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते श्री. अमोल विठ्ठल पुलवळे यांच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक करत अशा आरोग्यविषयक उपक्रमांची ग्रामीण भागात नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.

या शिबिरास साकत,कोल्हेवाडी ,कडभनवाडी ,पिंपळवाडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून भविष्यातही अशाच प्रकारचे लोकहिताचे उपक्रम राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!