रात्रभर चर्चासत्र तरीही अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस उजाडला, रोहित पवार मागण्यांवर ठाम
पंढरपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारपासून (12 जून) अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. त्यांचे हे आंदोलन पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरु आहे. प्रशासकीय शिष्टमंडळ आणि रोहित पवार यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या अनेक चर्चांनंतरही तोडगा निघाला नसल्याचेही समोर आले आहे. अशामध्ये शनिवारी (13 जून) दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यावेळी सकाळी डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांनी तपासणीही केल्याचे समोर आले. अशामध्ये कृषिमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतरही ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

शुक्रवारी रात्री अनेकदा प्रशासकीय शिष्टमंडळाने दोन ते तीनवेळा रोहित पवारांची भेट घेतली. पंढरपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वतः मध्यस्थी करत आहेत. अशामध्ये त्यांनी आंदोलनस्थळावरूनच रोहित पवार यांची थेट राज्याचे कृषिमंत्री आणि सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी 2019 च्या कर्जमाफीची जाचक अट मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे माध्यमांसमोर जाहीर करावे, तरच आम्ही हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा विचार करू, अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली होती. त्यानंतरही ते आपल्या आंदोलनावर ठाम राहिले आहेत.

“सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या परिपत्रकामध्ये 2019चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजारापर्यंत लाभ देण्याची अट आणि प्रोत्साहन अनुदान देताना 2025-26 आणि 2026-27 चे पीक कर्ज भरणे अनिवार्य केल्याची अट आहे. या दोनच अटींमुळे सुमारे 37 लाखाहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या दोन जाचक अटी आधी काढा, एवढीच आमची साधी सरळ मागणी आहे. तोपर्यंत अन्नत्याग आंदोलनातून माघार नाही,” अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी दुसऱ्यादिवशी मांडली आहे.

“माझे वडील, पत्नी आणि मुले भावूक झाली आहेत. माझी मुले बाबा लवकर घरी या, असा निरोप देत आहेत. पण अन्नदात्याच्या न्यायासाठीचा हा लढा आता थांबणार नाही.” असे रोहित पवार म्हणाले. मनोज जरांगे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते आणि इतर पक्षांचे नेते आंदोलनस्थळी येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करता, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अटी का? असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही विविध भागांतून शेतकरी संघटना आणि नागरिकांचा पाठिंबा मिळत असून सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

https://lokbhavanmarathinews.com
https://student.maharashtra.gov.in

