घणसोलीतील वारंवार वीज खंडित होण्यावर नगरसेवक गणेश सकपाळ आक्रमक; दोन महिन्यांत सुधारणा न झाल्यास जनआंदोलनाचा इशाराघणसोलीतील वारंवार वीज खंडित होण्यावर नगरसेवक गणेश सकपाळ आक्रमक; दोन महिन्यांत सुधारणा न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

घणसोली, तळवली आणि सेक्टर 21-22 मधील नागरिक त्रस्त; महावितरणविरोधात संताप

नवी मुंबई : घणसोली गाव, तळवली गाव, सेक्टर 21, सेक्टर 22 तसेच संपूर्ण घणसोली परिसरात वारंवार कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अनेकदा 8 ते 10 तास तर काही प्रसंगी तब्बल 24 तास वीज नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे.

या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर घणसोली विभाग कार्यालयात महावितरण अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत नगरसेवक गणेश सकपाळ यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार टीका करत नागरिकांच्या वतीने आक्रमक भूमिका मांडली.

बैठकीस प्रभाग समिती सभापती ललिता मढवी, ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, नगरसेविका अंजना म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर अनेक गंभीर समस्या मांडल्या. त्यामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीजपुरवठा खंडित होणे, तक्रारींचे वेळेत निराकरण न होणे, फोन कॉलला प्रतिसाद न मिळणे, तक्रार क्रमांक न देणे आणि अपुरे मनुष्यबळ यांचा समावेश होता.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार ट्रान्सफॉर्मर बिघाड, नादुरुस्त फिडर पिलर, जीर्ण झालेल्या केबल्स आणि निकृष्ट दर्जाच्या विद्युत यंत्रणेमुळे समस्या अधिक गंभीर बनल्या आहेत. किरकोळ तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठीही 4 ते 5 तासांचा कालावधी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

केबल फॉल्ट झाल्यानंतर दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य, उपकरणे आणि तांत्रिक साधने स्थानिक कार्यालयात उपलब्ध नसल्याने ठाणे, वाशी किंवा इतर विभागांतून साहित्य मागवावे लागते. परिणामी, काही मिनिटांत होणाऱ्या कामासाठी नागरिकांना अनेक तास अंधारात राहावे लागत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.

घणसोली हा नवी मुंबईतील सर्वाधिक लोकसंख्या आणि वीज ग्राहक असलेला विभाग असूनही येथे आवश्यक त्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर आणि अन्य सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला. वारंवार ट्रिपिंग, व्होल्टेज चढ-उतार आणि तांत्रिक बिघाडांमुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याच्याही तक्रारी नागरिकांनी मांडल्या.

काही नागरिकांनी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निकृष्ट दर्जाच्या केबल्स आणि साहित्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याची शक्यता व्यक्त करत स्वतंत्र तांत्रिक चौकशीची मागणी करण्यात आली.

यावेळी नगरसेवक गणेश सकपाळ यांनी महावितरण प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावले की, नागरिकांकडून नियमित वीजबिल आणि विविध आकारणी वसूल केल्या जातात, मात्र त्याबदल्यात दर्जेदार आणि अखंडित सेवा दिली जात नाही.

“घणसोली गाव, तळवली गाव, सेक्टर 21, सेक्टर 22 आणि संपूर्ण घणसोली विभागातील वीज ग्राहकांचा आता अंत पाहू नका. वारंवार होणारे वीज खंडित प्रकार, अपुरी यंत्रणा आणि तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यापुढे सहन केले जाणार नाही.”

सकपाळ यांनी पुढे इशारा देत सांगितले की, महावितरणने बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार पुढील दोन महिन्यांत नवीन ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर, केबल्स, अतिरिक्त मनुष्यबळ आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर घणसोलीतील नागरिकांसोबत व्यापक जनआंदोलन छेडले जाईल.

सकपाळ यांनी सांगितले की, नागरिकांमध्ये वीजबिल बहिष्काराची भावना निर्माण झाली असून आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत कठोर भूमिका घेण्याची मागणी होत आहे. तसेच थकीत बिलाचे कारण पुढे करून नागरिकांची वीज जोडणी खंडित करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास लोकशाही मार्गाने तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

घणसोलीतील वाढत्या वीज समस्यांची गंभीर दखल घेत नगरसेवक गणेश सकपाळ यांनी मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री तसेच स्थानिक आमदार आणि वनमंत्र्यांकडे स्वतंत्र पत्रव्यवहार केला आहे.

पत्रामध्ये घणसोली विभागासाठी विशेष निधी, अतिरिक्त मनुष्यबळ, नवीन ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर, केबल्स आणि अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. घणसोली हा नवी मुंबईतील सर्वाधिक ग्राहकसंख्या असलेला विभाग असून उपलब्ध यंत्रणा आणि मनुष्यबळ अत्यंत अपुरे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय भसाखेत्रे यांनी बैठकीत नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की,

“घणसोली परिसरातील वीज ग्राहकांच्या समस्या पुढील दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील. आवश्यक कामांना प्राधान्य देऊन युद्धपातळीवर कार्यवाही करण्यात येईल.”

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!