महापौर सुजाता पाटील यांची मोरबे धरणासह संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी शहरात पुरेसा पाणीसाठा; नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनमहापौर सुजाता पाटील यांची मोरबे धरणासह संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी शहरात पुरेसा पाणीसाठा; नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

नवी मुंबईकरांना शुद्ध, सुरक्षित आणि अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत महापौर सुजाता पाटील यांनी मोरबे धरण प्रकल्पासह शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेची सखोल पाहणी केली. यावेळी धरणातील उपलब्ध पाणीसाठा, जलशुद्धीकरण प्रक्रिया, वितरण व्यवस्था, बेलापूर येथील स्काडा सेंटर तसेच भविष्यातील पाणी नियोजनाबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात उपमहापौर दशरथ भगत, पाणीपुरवठा व मलनिःस्सारण समितीचे सभापती रविकांत पाटील, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, अतिरिक्त शहर अभियंता तथा पाणीपुरवठा विभाग प्रमुख अरविंद शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८८ मीटर एकूण क्षमतेच्या मोरबे धरणात सध्या ७२ मीटरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असून त्यातील १७ टक्के उपयुक्त साठा आहे. हा साठा जुलै महिन्यापर्यंत शहराच्या पाण्याच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत शहरातील काही भागांत गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत महापौरांनी धरणस्थळी प्रत्यक्ष पाण्याची गुणवत्ता तपासली. त्यांनी स्वतः पाणी पिऊन त्याची गुणवत्ता तपासली आणि धरणातील पाणी पूर्णपणे शुद्ध, सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी झालेल्या तांत्रिक शटडाऊनमुळे जलवाहिन्यांमध्ये साचलेली माती पाण्याच्या प्रवाहात आल्याने काही भागांत तात्पुरती गढूळ पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शहरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून १० टक्के पाणी कपातीचा नियोजित निर्णय घेतला आहे. तथापि, शहरात सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी नागरिकांना पाण्याचा जबाबदारीने आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. विशेषतः वाहन धुणे किंवा इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा तसेच पाणी संवर्धनासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!