Auto Rickshaw And Taxi Permit : आजपासून नवीन ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांना स्थगिती; सरकारचा मोठा निर्णय
मुंबई :
राज्यभरात नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाने तात्पुरते बंद
वाढती वाहतूक कोंडी रोखणे आणि शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ९ मार्चपासून राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
तथापि, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर परवाने द्यावेत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून त्यानुसार पुढील धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांबाबत राज्य सरकारचा अधिकार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्रातील ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत.
भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच या संदर्भात केंद्र सरकारकडे करण्यात आलेल्या पत्रव्यवहारानंतर केंद्राने कार्यालयीन स्मरणपत्राद्वारे ही भूमिका स्पष्ट केली आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार राज्य सरकारला अधिकार
मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम २०१९ अंतर्गत राज्य सरकारांना वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी आवश्यक लवचिकता देण्यात आली आहे.
याशिवाय Motor Vehicles Act 1988 मधील कलम ६७ (३) नुसार राज्य सरकारांना प्रवासी व माल वाहतुकीसंदर्भातील परवाने बदलण्याचा तसेच विविध योजना राबविण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करता येतील, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
हे हि वाचा-घणसोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न https://lokbhavanmarathinews.com/1057/ghansoli-jagatik-mahila-din/
राज्यभरात अंदाजे १४ लाखांपेक्षा जास्त ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाने
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, सध्या राज्यात सुमारे १४ लाखांपर्यंत ऑटो रिक्षा परवाने देण्यात आले आहेत.
काही ठिकाणी एकाच घरातील अनेक सदस्यांना परवाने देण्यात आले असल्याचे तसेच काही परवाने बांग्लादेशी नागरिकांना अवैधरित्या दिल्याच्या तक्रारीही शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.
लवकरच नवीन धोरण जाहीर होणार
राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबतचा विषय स्थानिक परिस्थिती आणि वाहतुकीच्या गरजेनुसार राज्य शासनाने योग्य पद्धतीने हाताळावा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.
राज्यातील नागरिकांना अधिक चांगली आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन लवकरच आवश्यक धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


