सारोळा शाळेतील राहुल लिमकर सर ‘गोविंद स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ ने सन्मानितसारोळा शाळेतील राहुल लिमकर सर ‘गोविंद स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

जामखेड (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथील उपक्रमशील, आदर्श तंत्रस्नेही व गणित-विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक श्री. राहुल बब्रुवान लिमकर यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच ‘गोविंद स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या या यशामुळे सारोळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ads

शिक्षण क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेले राहुल लिमकर सर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात प्रभावीपणे व्हावा यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. डिजिटल शिक्षण, ई-लर्निंग, प्रोजेक्टरच्या माध्यमातून अध्यापन, ऑनलाईन शैक्षणिक साधनांचा वापर, गणित व विज्ञान विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची शैली यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.

राहाता तालुक्यातील चांगदेवनगर तसेच जामखेड तालुक्यातील घोडेगाव व सारोळा येथील शाळांमध्ये कार्यरत असताना त्यांनी शाळांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहशालेय उपक्रम आणि लेझीम नृत्य यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उल्लेखनीय यश संपादन करून दिले आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा व तालुका स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.

Ads

राहुल लिमकर सर हे केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे तर समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात. शाळा आणि गाव यांच्यात समन्वय निर्माण करून लोकसहभागातून शाळेच्या विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. पालकांशी सातत्याने संवाद साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे. शाळेत विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक साहित्य, उपक्रम आणि प्रयोगशील अध्यापन पद्धतींचा अवलंब केला आहे.

बीड तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे आयोजित गोविंद स्मृती स्मार्ट ग्रंथालयाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी पिंपळनेर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुसदन घुगे साहेब यांच्या हस्ते राहुल लिमकर सरांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना राहुल लिमकर सर यांनी हा सन्मान विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि सहकारी शिक्षकांचा असल्याची भावना व्यक्त केली. “विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी पुढील काळातही अधिक जोमाने कार्य करत राहणार,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले असून शाळेचा गौरव वाढला आहे.

या सन्मानाबद्दल जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख माजीद शेख, सारोळा शाळेचे मुख्याध्यापक संदीप भालसिंग यांनी राहुल लिमकर सरांचे अभिनंदन केले. तसेच सारोळा गावच्या सरपंच रितूताई काशीद, अजयदादा काशीद, उपसरपंच हर्षद मुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकवृंद यांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुल लिमकर सरांना मिळालेला हा पुरस्कार केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण सारोळा शाळा, विद्यार्थी आणि परिसरासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. त्यांच्या कार्यातून ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळत असून अनेक शिक्षकांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!