नेरुळ एल.पी. नाका दुर्घटना प्रकरणी मनसेची आक्रमक भूमिका; संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची एसीपींकडे मागणीनेरुळ एल.पी. नाका दुर्घटना प्रकरणी मनसेची आक्रमक भूमिका; संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची एसीपींकडे मागणी

नवी मुंबई | प्रतिनिधी

नेरुळ येथील एल.पी. नाका पुलाखाली पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह उतरल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागून त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित प्रकरणात नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील जबाबदार अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि देखभाल कंत्राटदारांविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष तथा प्रवक्ते गजानन श्रीकृष्ण काळे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात ही घटना केवळ अपघात नसून संबंधित यंत्रणेच्या गंभीर निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, महावितरणच्या स्पष्टीकरणात संबंधित पथदिवा, वीजजोडणी आणि आउटगोइंग केबल ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील असल्याचे नमूद करण्यात आले असून, तिची देखभाल करण्याची जबाबदारीही महापालिकेची असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेची सखोल फौजदारी चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच घटनास्थळावरील सदोष केबल, मीटर बॉक्स, विद्युत सुरक्षा उपकरणे, सीसीटीव्ही फुटेज, देखभाल नोंदी, सुरक्षा तपासणी अहवाल आणि कंत्राटाशी संबंधित कागदपत्रे तातडीने जप्त करून वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

मनसेने भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू तरतुदींनुसार संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, कोणत्याही अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदाराला राजकीय अथवा प्रशासकीय संरक्षण देऊ नये, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून निष्पक्ष तपास सुरू न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!