मनोज काशीद यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान; पिंपळवाडीच्या माजी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती.शिक्षक दिनानिमित्त प्रवरानगर येथे पुरस्कार वितरण सोहळा
अहिल्यानगर सुनिल पुलवळे
शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी जि. प. प्राथमिक शाळा, खोसपुरी येथे कार्यरत असलेले उपाध्यापक मनोज काशीद यांना प्रतिष्ठेच्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मनोज काशीद यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुघे, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पिंपळवाडी ते खोसपुरीपर्यंत उल्लेखनीय शैक्षणिक कार्य
मनोज काशीद यांनी सुमारे नऊ वर्षांपूर्वी जामखेड तालुक्यातील पिंपळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असताना उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केले. सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोसपुरी येथे उपाध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
पिंपळवाडी आणि खोसपुरी येथील त्यांच्या गुणवत्तापूर्ण, नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
काशीद सरांसाठी पिंपळवाडीकरांनी पार केले १७० किलोमीटरचे अंतर
पिंपळवाडी गावाशी असलेले आपले ऋणानुबंध जपणाऱ्या मनोज काशीद यांच्या गौरव सोहळ्यास जामखेड तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि पालकांनी विशेष उपस्थिती दर्शविली.
काशीद सरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पिंपळवाडी येथून तब्बल १७० किलोमीटर अंतर पार करून ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवरानगर येथे उपस्थित राहिले. ही उपस्थिती शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याच्या नात्याचे उत्तम उदाहरण ठरली.
ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी केले अभिनंदन
यावेळी डॉ. सतीश घोलप, भाऊसाहेब घोलप, काकासाहेब टेकाळे, महारुद्र नेमाने, अशोक नेमाने (माजी सैनिक), शरद घोलप, गोपाळ नेमाने, देवेंद्र घोलप, विकास टेकाळे, दिनकर घोलप, दिलीप घोलप आणि राम ढवळे सर यांच्यासह पिंपळवाडीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि पालकांनी मनोज काशीद यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नाविन्यपूर्ण शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वेगळी ओळख
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे तसेच शाळा आणि समाज यांच्यात दृढ नाते निर्माण करणे, या माध्यमातून मनोज काशीद यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
पिंपळवाडी आणि खोसपुरी येथील त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना मिळालेल्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे दोन्ही गावांसह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://lokbhavanmarathinews.com
https://student.maharashtra.gov.in

