शिक्षक पात्रतेचा TET पेपर फुटला, रविवारी होणारी परीक्षा रद्दशिक्षक पात्रतेचा TET पेपर फुटला, रविवारी होणारी परीक्षा रद्द

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ पुढे ढकलण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न बाहेर गेल्याचा संशय निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेसाठी सुरक्षेच्या सर्व आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. मात्र, शनिवारी (दि. २७ जून) पहाटे गुप्त माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही व्यक्तींकडे TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून तपास सुरू केला.

तपासासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पडताळणीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्नांचा TET जून २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी साधर्म्य असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे.

परीक्षेच्या नव्या तारखेसह पुढील सर्व अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.

https://lokbhavanmarathinews.com

https://mahatet.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!