साकत येथील श्री.रामभाऊ (आबा )मुरूमकर यांना ‘दैनिक लोकनेता’चा राज्यस्तरीय "वृक्षमित्र २०२६" पुरस्कार जाहीर: पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्याची दखल.साकत येथील श्री.रामभाऊ (आबा )मुरूमकर यांना ‘दैनिक लोकनेता’चा राज्यस्तरीय "वृक्षमित्र २०२६" पुरस्कार जाहीर: पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्याची दखल.

साकत (ता. जामखेड) येथील सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे वृक्षमित्र रामभाऊ बाबासाहेब मुरूमकर यांना ‘दैनिक लोकनेता’च्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचा प्रतिष्ठेचा वृक्षमित्र २०२६ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निस्वार्थी व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान केला जाणार असून, १० मे रोजी सिरसाळा, परळी वैजनाथ येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

काही वर्षांपूर्वी पूर्णपणे ओसाड व निर्जीव असलेला साकत येथील स्मशानभूमी परिसर आज हिरवागार आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या परिवर्तनामागे रामभाऊ मुरूमकर यांची दूरदृष्टी आणि अथक परिश्रम आहेत. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी गावातील दोन्ही स्मशानभूमींमध्ये कुंपण उभारून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली. गेल्या ४ ते ५ वर्षांत झाडांची निगा राखत पाणीपुरवठा, मशागत आणि संरक्षण यावर विशेष भर दिल्याने आज येथे दाट हिरवाई आणि थंडगार सावली अनुभवायला मिळते.

उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याचे लक्षात घेऊन मुरूमकर यांनी एक अभिनव उपक्रम राबवला. झाडांच्या सावलीत विविध ठिकाणी पाणवठे तयार करून मातीच्या भांड्यांमध्ये व छोट्या टाक्यांमध्ये नियमित स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते. यामुळे चिमण्या, कबुतरे, कावळे तसेच इतर अनेक पक्षी मोठ्या संख्येने येथे आकर्षित होऊ लागले आहेत. पाणी पिल्यानंतर हे पक्षी झाडांच्या सावलीत विसावतात, ज्यामुळे परिसरात शांत, प्रसन्न आणि नैसर्गिक वातावरण निर्माण झाले आहे.

या उपक्रमामुळे केवळ परिसर सुशोभित झाला नाही, तर जैवविविधतेतही मोठी वाढ झाली आहे. विविध पक्ष्यांचे आगमन वाढल्याने पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होत आहे. स्थानिक नागरिकांनाही या बदलाची जाणीव होत असून, पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.

Ads

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करत रामभाऊ मुरूमकर यांनी स्मशानभूमीचे नंदनवनात रूपांतर केले आहे. वनविभागात तब्बल ३७ वर्षे प्रामाणिक सेवा बजावलेल्या मुरूमकर यांनी निवृत्तीनंतरचे आयुष्य पूर्णपणे वृक्षसंवर्धनासाठी वाहून घेतले आहे. आपल्या अनुभवाचा उपयोग समाजहितासाठी करत त्यांनी हा प्रेरणादायी उपक्रम उभा केला आहे.

त्यांच्या कार्यामुळे पंचक्रोशीत त्यांची ‘वृक्षमित्र’ म्हणून विशेष ओळख निर्माण झाली आहे. जामखेड तालुक्यातील अनेक नागरिक त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत असून, विविध गावांमध्ये अशा उपक्रमांना चालना मिळत आहे. पर्यावरण संवर्धनाचा उत्कृष्ट आदर्श ठरलेल्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत आहे.

Ads

‘दैनिक लोकनेता’कडून जाहीर झालेला वृक्षमित्र २०२६ पुरस्कार हा त्यांच्या कार्याची योग्य दखल असून, या सन्मानामुळे त्यांच्या उपक्रमाला आणखी बळ मिळणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल साकतसह संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

याबद्दल साकत गावासह जामखेड तालुका आणि पंचक्रोशीतील नागरिकांकडून रामभाऊ मुरूमकर यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या निस्वार्थी वृक्षसंवर्धन कार्यामुळे केवळ परिसराचे सौंदर्य वाढले नाही, तर पर्यावरणाबद्दल जागरूकताही निर्माण झाली आहे. अनेक सामाजिक संस्था, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमी व्यक्तींनी त्यांच्या कार्याचे मनापासून स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


रामभाऊ मुरूमकर यांनी अत्यंत साधेपणाने आणि सातत्याने केलेले हे कार्य समाजासाठी एक आदर्श ठरत असून, त्यांच्या या यशामुळे पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला नवी दिशा आणि उर्जा मिळत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे भविष्यात अधिकाधिक लोक वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी पुढे येतील, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

गितेवाडी शाळा गुणवत्तेची खाण.. उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते:विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रम गितेवाडी शाळेत संपन्न… https://lokbhavanmarathinews.com/1368/getewadi-shala/

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!