Rohit Pawar : अजित दादांच्या आठवणीत पुतण्या हळहळला, शोक प्रस्ताव मांडताना रोहित पवारांना अश्रू अनावर
मुंबई
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या स्मरणार्थ शोक प्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभेत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी तर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी हा प्रस्ताव सादर करत त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
प्रस्ताव मांडल्यानंतर विविध पक्षांचे आमदार आणि मंत्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे Rohit Pawar यांनीही सभागृहात बोलताना काकांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या भाषणात राजकीय कार्यासोबतच वैयक्तिक नात्याची जिव्हाळ्याची छटा दिसून आली.
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचा उल्लेख करत त्यांच्या प्रशासनातील पकडीबद्दल आणि निर्णयक्षमतेबद्दल विशेष गौरवोद्गार काढले. त्यांनी सांगितले की, राज्याच्या विकासासाठी अखंड परिश्रम करणारा आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद ठेवणारा नेता आज आपल्यात नाही.
रोहित पवार भावूक भाषण; अजित पवारांच्या आठवणीत अश्रू अनावर
आमदार रोहित पवारांनी विधानसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोक प्रस्तावावर भाषण करताना त्यांच्या काकांच्या आठवणींना उजाळा दिला. परंतु, भाषणाचा शेवट करताना रोहित पवारांना हुंदका दाटून आला आणि त्यांचे अश्रू ओघळल्याचे पाहायला मिळाले.
सभागृहात भाषणाचा शेवट करत असताना रोहित पवार म्हणाले की, प्रशासनावर वचक असणारा नेता गेला, जातीधर्माच्या पलिकडे काम करणारा नेता गेला. सूर्याशी स्पर्धा करणारा नेता गेला. सूर्य उगवण्याआधी कामाला सुरुवात आणि सूर्य मावळल्यानंतर काम बंद करणारा नेता गेला. अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता गेला. महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाब गेला. बेट्या म्हणून आव्हान देणारा ग्रामीण बाज गेला.
महाराष्ट्रातील राजकारणातला रांगडेपणा गेला. राज्याच्या राजकारणातील बेधडकपणा गेला, राज्याच्या राजकारणातील वेग आणि आवाका गेला. महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला. अजितदादा पवार नावाचा जादूगार हसवत-हसवत संबंध महाराष्ट्राला निःशब्द करून गेला, अशा भावना रोहित पवारांनी व्यक्त केल्या.
यावेळी, त्यांनी अजित पवार त्यांना काय सल्ले द्यायचे, याबाबतच्या आठवणीही सभागृहात सांगितल्या. याबाबत ते म्हणाले की, मला ते म्हणायचे, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्या आहेत, झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे, तुझं शारीरिक वजन वाढले आहे. ते शारीरिक वजन कमी कर. राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो, हो करतो. पण मी त्यांना शब्द देतो, माझी हेअर स्टाईल अशीच ठेवेन. शारीरिक वजन कमी करेन, राजकीय वजन वाढवेन, पण एक गोष्ट मात्र खरी, वरचं बटन वरपर्यंत लावत जा, असे ते म्हणायचे. मला काकांना एक सांगायचे आहे, 40-50 वर्षांनी मी जेव्हा तुम्हाला भेटेने तोपर्यंत मी हे बटन असंच उघडं ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यावर लावेन. हे बटन असं ठेवल्यावर तुमची आठवण मला येईल, असे म्हणत असताना रोहित पवार यांना रडू कोसळले.
तसेच, 40-50 वर्षांनी जेव्हा अजित काकांची भेट होईल, मी जो लढा लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताठ मानेने उभा राहीन. माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरका. या गोष्टी ऐकण्यासाठी हा छोटासा आणि महत्त्वाचा लढा सर्वांनी हातात घेतला आहे. तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. दादांच्या अपघाताला जो कोणी दोषी असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय, शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तो कितीही मोठा असला तरी आम्ही घाबरणार नाही, असेही यावेळी रोहित पवारांनी निर्भिडपणे आपल्या भाषणातून म्हटले आहे
पहाटेचा शपथविधी ते कधीही न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री’; देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या आठवणींना दिला उजाळा
“अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहीलेले नेते होते. कधीतरी मुख्यमंत्री होईन. पण, कायम उपमुख्यमंत्री राहीन, असं अजित पवार कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते”, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
हा शोकप्रस्ताव अत्यंत वेदनादायक- फडणवीस
विधानसभेची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनावर शोकप्रस्तावावर बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, “आज मनात वादळ आहे. अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडावा लागेल, याची कल्पनाही करवत नाही. सभागृहात उजव्या बाजूला पाहिलं की अजितदादा दिसायचे. कितीही उशीरापर्यंत कामकाज चाललं तरी ते शेवटपर्यंत बसलेले असायचे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
दशकापेक्षा अधिक काळ आमची मैत्री –
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, “राजकारणात स्थिरावलेले, नेतृत्व सिद्ध केलेले अजित पवार यांचं जाणं म्हणजे एक मोठी पोकळी निर्माण होणं आहे. आता दुसरे ‘अजितदादा’ होणं शक्य नाही.” दशकाहून अधिक काळाची मैत्री आठवत त्यांनी अजित पवारांच्या निधनाच्या एक दिवस आधी झालेल्या कॅबिनेट बैठकीची आठवण सांगितली. “बैठकीनंतर पायाभूत सुविधांवरील चर्चा झाली. त्यांच्या सिग्नेचर स्टाईलनं त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. प्रत्येक मुद्दा कागदावर नोंदवलेला असायचा. त्यानंतर आम्ही पाऊण तास गप्पा मारल्या. पण ती शेवटची भेट ठरेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती,” असे ते म्हणाले. “एक दशकापेक्षा अधिक काळ आमची मैत्री होती”, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं
वर्षा बंगल्यावर ‘तो’ निर्णय मागे घ्यायचं ठरले…!
2019 मधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, “आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. वरिष्ठांनी नंतर भूमिका बदलली, पण अजितदादांनी ‘मी शब्द दिला आहे’ असे ठामपणं सांगितलं. शपथविधीनंतर न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला. वर्षा बंगल्यावर बसून आम्ही तो निर्णय मागे घेण्याचं ठरवलं.” त्या काळातील त्यांची भूमिका आणि धैर्य फडणवीसांनी विशेषत्वाने अधोरेखित केलं. “सकाळी 9 वाजता घेतलेला शपथविधी हा पहाटेचा नव्हता”, असं अजित पवार कायम सांगायचे, अशी त्यांनी आठवणही सांगितली. अजित पवारांचा वक्तशीरपणा हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “मंत्रालयात अधिकारी येण्याआधी अजितदादा पोहोचायचे. मंत्रालयाची सुरुवातच त्यांच्या उपस्थितीनं व्हायची.”



[…] Rohit Pawar : अजित दादांच्या आठवणीत पुतण्या हळहळला, शोक प्रस्ताव मांडताना रोहित पवारांना अश्रू अनावर https://lokbhavanmarathinews.com/874/rohit-pawar-ashru-anavar-ajit-pawar-shok-prastav-vidhansabha/ […]