“श्री हनुमान विद्यालय दिघोळमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित”दहावीचा निरोप समारंभ श्री हनुमान विद्यालय दिघोळ येथे उत्साहात संपन्न; शिक्षक, विद्यार्थी आणि प्रमुख पाहुणे उपस्थित”

श्री हनुमान विद्यालय, दिघोळ (ता. जामखेड) येथे दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पुष्प व पेन देऊन सन्मान करत कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री माऊली निर्मळ हे होते. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड बी. टी., व्याख्याते माननीय डॉ. अशोक राजेंद्र गीते, सरपंच संतोष शिंदे, उपसरपंच दशरथ राजगुरू, तंटामुक्ती अध्यक्ष धीरज रसाळ, हनुमंत तागड यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक देशमुख सर, दहिफळे सर, नागदेव सर, राठोड सर, कांबळे सर, श्रीमती तनपुरे मॅडम, श्रीमती बेंबडे मॅडम, बिरंगळ भाऊसाहेब, निर्मळ मामा तसेच समस्त दिघोळ गावकरी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातील पाहुण्यांचा परिचय व स्वागत श्री रोडे सर यांनी केले.

प्रमुख पाहुणे डॉ. अशोक राजेंद्र गीते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षणाच्या प्रवासात यश-अपयश हे येतच असते; मात्र अपयशाने खचून न जाता, नैराश्य न येऊ देता परिस्थितीची जाणीव ठेवून सातत्याने व चिकाटीने अभ्यास केल्यास आपले इच्छित ध्येय निश्चितच साध्य करता येते.

ते पुढे म्हणाले की, केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता शिक्षणासोबत खेळालाही महत्त्व द्यावे. खेळामुळे शिस्त, संघभावना, आत्मविश्वास वाढतो तसेच यश-अपयश स्वीकारण्याची मानसिक क्षमता विकसित होते. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर स्पर्धेला सामोरे जावे लागते आणि ही स्पर्धा समजून घेण्याची ताकद खेळामुळेच मिळते, असे त्यांनी सांगितले.

दहावीनंतरच्या शैक्षणिक प्रवासाबाबत बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांचा गैरसमज दूर करत सांगितले की, दहावीनंतर कॉलेज सुरू होते असा समज असतो; मात्र खऱ्या अर्थाने कॉलेजचे शिक्षण हे बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमात सुरू होते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी योग्य नियोजन, स्पष्ट उद्दिष्टे व सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड बी. टी. सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दहावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर घेतलेले निर्णय भविष्यातील शिक्षण व करिअरची दिशा ठरवतात. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास न गमावता शिस्तबद्ध अभ्यासाची सवय कायम ठेवावी. शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून सातत्याने मेहनत केल्यास यश निश्चितच मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमासाठी मंडपासाठीचे आर्थिक सहकार्य श्री हनुमंत तागड यांनी केले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केली . बेंबडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गोड जेवण बनवण्यासाठी मार्गदर्शन केले.
तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी साऊंड सिस्टिम विकत घेण्यासाठी १० हजार रुपये देण्याची घोषणा केली. या उपक्रमाबद्दल नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थिनी कु. भक्ती विटकर, ऋतुजा तागड आणि शिवानी रसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी शाळेत शिक्षकवृंदांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि शैक्षणिक तसेच शिस्तीच्या प्रशिक्षणाबद्दल विशेष आभार मानले. विद्यार्थिनींनी सांगितले की, शाळेतील शिक्षकांनी दाखवलेला मार्ग आणि दिलेल्या संस्कारांमुळे त्यांच्यात आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि कठोर परिश्रम करण्याची सवय निर्माण झाली आहे.

त्यांनी पुढील काळात शाळेत शिकलेल्या शिस्तीचे आणि नैतिक मूल्यांचे पालन करून विविध क्षेत्रात यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच त्यांनी शाळेच्या नावाचा गौरव वाढवण्याचे वचन दिले, जे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यांच्यामुळे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भाग्यश्री शिंदे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार श्री देशमुख सर यांनी मानले.

दहावी निरोप समारंभ श्री हनुमान विद्यालय दिघोळ हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय व प्रेरणादायी टप्पा ठरला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशासोबत सातत्य, आत्मविश्वास, शिस्त आणि खेळाचे महत्त्व समजले. डॉ. अशोक गीते व मुख्याध्यापक श्री. गायकवाड बी. टी. सर यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी योग्य दिशा मिळाली. शिक्षक, पालक आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीने हा निरोप समारंभ अधिक अर्थपूर्ण ठरला. शाळेने दिलेले संस्कार, मूल्ये आणि शिस्त घेऊन विद्यार्थी विविध क्षेत्रात यश संपादन करतील व श्री हनुमान विद्यालय दिघोळचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

Education World (Educational Resources)

  • https://www.educationworld.in/
  • Description: विद्यार्थ्यांसाठी प्रेरक लेख, शिक्षण टिप्स व अभ्यास सामग्री.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!