नवी मुंबई महापौर सुजाता पाटीलनवी मुंबई महापौर सुजाता पाटील व उपमहापौर दशरथ भगत

नवी मुंबई महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर श्री. दशरथ सिताराम भगत यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाला नवी मुंबईकरांनी भरभरून पाठिंबा दिल्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणजित यादव यांनी पीठासन अधिकारी म्हणून या निवडणुकीचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर केला. यावेळी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. सभेच्या सुरुवातीस महापालिका सचिव श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांनी पीठासन अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

बिनविरोध निवडीची प्रक्रिया

महापौरपदासाठी दाखल झालेल्या अर्जातून नगरसेविका श्रीम. सरोज रोहिदास पाटील यांनी, तर उपमहापौरपदासाठी नगरसेवक श्री. आकाश बाळकृष्ण मढवी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नवी मुंबई महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत यांची बिनविरोध निवड निश्चित झाली

दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर पदाचे स्थानग्रहण झाल्यानंतर सभागृहाच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांनी सभागृहातील सर्व सदस्यांचे आभार मानले.

महापौर सुजाता पाटील यांची प्राधान्यक्रम जाहीर

महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांनी आपल्या पहिल्याच भाषणात नवी मुंबईच्या विकासासाठी स्पष्ट दिशा मांडली.

पुढील प्राधान्यक्रम जाहीर:

  • स्वच्छता
  • आरोग्य सेवा
  • शिक्षण व्यवस्था
  • पर्यावरण संरक्षण
  • वाहतूक नियोजन

तरुणांना संधी, महिलांची सुरक्षा व सन्मान, ज्येष्ठ नागरिकांचा आदर आणि सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असलेल्या मूलभूत सुविधा पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे त्यांनी नमूद केले.

महिलांच्या प्रगतीचे प्रतीक – महापौर सुजाता पाटील

नवी मुंबई महापौर सुजाता पाटील यांनी गृहिणी ते नगरसेविका, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीनंतर महापौरपदापर्यंतचा प्रवास महिलांच्या समाजातील प्रगतीशील वाटचालीची साक्ष असल्याचे सांगितले. नवी मुंबईच्या गतीमान व सर्वांगीण विकासासाठी संवेदनशीलपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

उपमहापौर दशरथ भगत यांचा निर्धार

उपमहापौर श्री. दशरथ भगत यांनी देशभरात नावलौकिक असणा-या नवी मुंबईच्या अधिक गतीमान विकासासाठी उपमहापौरपद ही एक मोठी संधी असून त्यासाठी अथक व प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले. आगामी काळात नवी मुंबईकर नागरिकांना अपेक्षित असे चांगले काम सर्वांना सोबत घेऊन केले जाईल असा निर्धार व्यक्त करीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी सर्व सहयोगी सदस्यांचे आभार मानले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे आणि इतर विभागाप्रमुख तसेच माजी खासदार श्री. संजीव नाईक, माजी आमदार श्री. संदीप नाईक आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांचे अभिनंदन केले.

“नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल” – लोकनेते गणेश नाईक साहेब

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाला नवी मुंबईकरांनी भरभरून पाठिंबा देत अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सुजाता सुरज पाटील व उपमहापौरपदासाठी दशरथ सीताराम भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महापालिका सभागृहात भाजपच्या सक्षम नगरसेवकांची टीम आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने पार पाडेल आणि पक्षाला अभिप्रेत असलेले लोकाभिमुख व विकासाभिमुख कार्य करून नवी मुंबईच्या प्रगतीला आणखी उंचीवर नेईल, असा ठाम विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी गणेश नाईक यांनी नवी मुंबईत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या या घवघवीत यशाचे श्रेय देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी व प्रभावी नेतृत्वाला, राज्यातील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम व निर्णयक्षम नेतृत्वाला तसेच संघटन कौशल्याने पक्ष अधिक मजबूत करणारे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना दिले.

या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांची अभेद्य एकजूट आणि नवी मुंबईच्या हिताची कळकळ असलेल्या जागरूक नागरिकांचा पाठिंबा निर्णायक ठरला असून, त्याबद्दल त्यांनी सर्व नवी मुंबईकरांचे मनःपूर्वक आभार मानले.

यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की,नवी मुंबईच्या विकासाची गती अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी लवकरच आजी-माजी ज्येष्ठ नगरसेवक, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन आगामी पाच वर्षांची विकासदिशा निश्चित करण्यात येईल. स्वच्छ नवी मुंबई, हरित नवी मुंबई, फेरीवाला-मुक्त नवी मुंबई तसेच शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय पुढील २० वर्षे मालमत्ता कर वाढवला जाणार नाही, हा दिलेला शब्द कायम ठेवण्यात येईल. लवकरच जनतेच्या विश्वासावर आधारित विकासाचा सविस्तर मसुदा तयार करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

नवी मुंबई महानगरपालिका बातम्या-https://nmmc.gov.in

https://www.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!