आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त कुसळंबमध्ये ‘आण्णा महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन
भव्य राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
तीन दिवस रंगणार क्रीडा, आरोग्य व सांस्कृतिक पर्व
पाटोदा (प्रतिनिधी : गणेश शेवाळे)
आण्णा महोत्सव २०२६–मराठवाडा भूषण लोकनेते तथा माजी महसूल राज्यमंत्री आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त कुसळंब येथे आयोजित ‘आण्णा महोत्सव २०२६’ मध्ये तीन दिवस विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. दिनांक १ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री खंडेश्वर मैदान, कुसळंब (ता. पाटोदा, जि. बीड) येथे हा महोत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे.
१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजता श्री खंडेश्वर दर्शनाने महोत्सवाची सुरुवात होणार असून सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या वेळेत शालेय कबड्डी स्पर्धा होणार आहे. त्यानंतर भव्य राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून रात्री उशिरापर्यंत सामने रंगणार आहेत.

२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता खुल्या कबड्डी स्पर्धेतील सेमी फायनल व फायनल सामने होणार आहेत. याच दिवशी सकाळी १० वाजता महाआरोग्य शिबिर, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत चिकित्सा तसेच कान-नाक-घसा तपासणी असे विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. दुपारी ३ वाजता मराठवाडा भूषण लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ह.भ.प. शिवचरित्रकार ज्ञानेश्वर माऊली कोठुळे महाराज (भिवंडी) यांचे कीर्तन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता बैलगाडा शर्यत होणार असून ग्रामीण क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळणार आहे. सायंकाळी ८ वाजता भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून पुणे येथील नामांकित कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.
“खेळ, आरोग्य व संस्कृती यांचा सुंदर संगम साधत सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त उपक्रम राबवणे हा ‘आण्णा महोत्सव’चा मुख्य उद्देश आहे,” असे मुख्य आयोजक माऊली (आप्पा) जरांगे यांनी सांगितले. तरी सर्व नागरिकांनी व क्रीडाप्रेमींनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


