बी.के. शिंदे कॉलेजने उघडला ग्रामीण शिक्षणाचा नवा अध्याय
डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन; नगरसेवकांचा सत्कार सोहळा
जामखेड | प्रतिनिधी :
श्रीनाथ एज्युकेशन फाउंडेशनच्या बी.के. शिंदे कॉलेजमध्ये मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

“श्रीनाथ एज्युकेशन फाउंडेशनच्या बी.के. शिंदे कॉलेजमार्फत ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण, गुणवत्ता आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ही संस्था अत्यंत कमी कालावधीत नावारूपाला आली आहे,” असे प्रतिपादन माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, बी.के. शिंदे कॉलेजने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे खुली केली आहेत. शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या तोडीस तोड सुविधा आणि दर्जेदार अध्यापन पद्धती ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, कौशल्याधारित शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास यांची नितांत गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करून कॉलेजने अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा केल्या आहेत.

फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळत असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती, मार्गदर्शन व विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. शिक्षकवर्गाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांशी असलेली आपुलकी, शिस्तबद्ध वातावरण आणि आधुनिक शैक्षणिक साधनसामग्री यामुळेच बी.के. शिंदे कॉलेज अल्पावधीतच विद्यार्थ्यांची व पालकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरले आहे, असेही चिंतामणी यांनी नमूद केले.
बी.के. शिंदे कॉलेजचे उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी व अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष पोपट राळेभात यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रा. शिंदे यांनी कॉलेजमधील प्रत्येक वर्गखोलीत डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवले असून त्यामुळे अध्यापन प्रक्रियेत गुणवत्ता व परिणामकारकता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक समजण्यास सोपे, रोचक व परिणामकारक शिक्षण मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना राळेभात म्हणाले की, या कॉलेजच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी घडले असून यासाठी प्राचार्य पंकज शिंदे हे अत्यंत तळमळीने व समर्पित वृत्तीने कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत मोठ्या पदांवर कार्यरत असून कॉलेजचे नाव उज्वल करत आहेत. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात व आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष पोपट राळेभात हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने हे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मंगलताई शिंदे, सचिव बाळासाहेब शिंदे, भाजप गटनेते तथा नगरसेवक तात्याराम पोकळे, प्राचार्य तथा नगरसेवक विकी घायतडक, मोहन पवार, राजेंद्र गोरे, पवन राळेभात, नगरसेविका वर्षाताई माने, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, मनोज कुलकर्णी, अर्जुन म्हेत्रे, प्रवीण होळकर, वसिम सय्यद, संतोष गव्हाळे, सागर टकले, प्राध्यापक पंकज शिंदे आदी मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष पोपट राळेभात हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने हे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मंगलताई शिंदे, सचिव बाळासाहेब शिंदे, भाजप गटनेते तथा नगरसेवक तात्याराम पोकळे, प्राचार्य तथा नगरसेवक विकी घायतडक, मोहन पवार, राजेंद्र गोरे, पवन राळेभात, नगरसेविका वर्षाताई माने, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, मनोज कुलकर्णी, अर्जुन म्हेत्रे, प्रवीण होळकर, वसिम सय्यद, संतोष गव्हाळे, सागर टकले, प्राध्यापक पंकज शिंदे आदी मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बी. के. शिंदे कॉलेजमध्ये शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात असून, विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमांचा विशेष लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत असून, उच्च शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी अधिक खुली झाली आहेत.
महाविद्यालय प्रशासनाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच व्यावसायिक व कौशल्याधारित कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी, संगणक प्रशिक्षण तसेच व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित उपक्रमांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आर्थिक व भौगोलिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन बी. के. शिंदे कॉलेजने किफायतशीर फी, मार्गदर्शन वर्ग, शिष्यवृत्तीविषयक माहिती आणि समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे ओढा वाढताना दिसत आहे

