घणसोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न
नवी मुंबई घणसोली (प्रतिनिधी)
जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भारतीय जनता पार्टी घणसोली विभाग, समृद्धी फाऊंडेशन आणि गणेश सकपाळ सामाजिक संस्था, घणसोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले मोफत भव्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर रविवारी (दि. ८ मार्च २०२६) घणसोली येथे उत्साहात पार पडले. या सामाजिक उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गणेश सकपाळ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घणसोली परिसरात दरमहा मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे नियमित आयोजन करण्यात येत असते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून एकूण १,२२५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळाली असून त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे.
याच सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून आज जागतिक महिला दिनानिमित्त विशेष मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
130 ते 140 नागरिकांची नेत्र तपासणी
या शिबिरात एकूण १३o नागरिकांनी मोतीबिंदूची तपासणी करून घेतली. तपासणीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्व नागरिकांची सखोल नेत्र तपासणी केली. त्यापैकी ९५ नागरिकांना मोतीबिंदूचा त्रास असल्याचे निदान झाले.
मोतीबिंदू आढळलेल्या सर्व रुग्णांची पुढील उपचारासाठी नोंदणी करण्यात आली असून त्यांची मोफत शस्त्रक्रिया आर. शंकरा झुनझुनवाला हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च आयोजकांकडून करण्यात येणार असून रुग्णांना ये-जा, तपासणी तसेच शस्त्रक्रियेच्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून अनेक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी नवी मुंबई महानगरपालिका गटनेते सागरजी नाईक , नगरसेवक तथा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे उपसभापती गणेश सकपाळ यांच्यासह श्री. गणेश खपके, श्री. रविंद्र राजिवडे, ह.भ.प. सुनील महाराज रानखर, श्री. करण म्हात्रे, श्री. निखिल म्हात्रे, श्री. भाऊसाहेब सावंत, श्री. सुनील साळेकर, श्री. कल्पेश म्हात्रे, श्री. प्रितेश गायकवाड, श्री. मंगेश साळेकर, श्री. संजय क्षीरसागर, श्री. सचिन हजारे, श्री. बाबू लोंढे,अंजली पाठक (समाज सेविका ), डॉ. मृणाल ठाकूर, सोनाली जगदाळे, अश्विनी महाले आणि सुजय कोल्हापूरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मा. महापौर सागरजी नाईक यांची प्रमुख उपस्थिती; गणेशदादा सकपाळ यांच्या कार्याचे कौतुक
या शिबिराला मा. महापौर श्री. सागरजी नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी शिबिराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला आणि या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना त्यांनी कार्यसम्राट नगरसेवक श्री. गणेशदादा सकपाळ यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच भविष्यातही नागरिकांच्या हितासाठी अशा सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया – नागरिकांना मोठा दिलासा
या उपक्रमांतर्गत नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून ज्या रुग्णांना मोतीबिंदूचा त्रास आहे अशा रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात येते. या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च आयोजकांकडून केला जातो.रुग्णांना त्यांच्या घरापासून हॉस्पिटलपर्यंत ये-जा करण्याचा खर्च, शस्त्रक्रियेचा खर्च आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा पूर्णपणे मोफत दिल्या जातात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
साधारणपणे खाजगी रुग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र या सामाजिक उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना मोफत उपचाराची संधी मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सामाजिक कार्यातून आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न
यावेळी बोलताना नगरसेवक तथा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे उपसभापती मा. श्री. गणेशदादा सकपाळ यांनी सांगितले की, हा सामाजिक उपक्रम मा. गणेशजी नाईक, डॉ. संजीवजी नाईक, मा. संदीपजी नाईक आणि मा. सागरजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. समाजातील गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
भविष्यातही आरोग्य शिबिरे
येत्या काळात नवी मुंबई परिसरात विविध आरोग्य शिबिरे आणि वैद्यकीय तपासणी मोहिमा आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी असे उपक्रम पुढेही सुरू ठेवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

हि बातमीही वाचा

