सभापती प्रा. राम शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्ते कामे आणि चोंडी विकास आराखड्याबाबत घेतलेली बैठकअहिल्यानगर जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश देताना सभापती प्रा. राम शिंदे.

मुंबई, दि.५ : ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ व्हावे आणि नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रलंबित रस्ते कामांना गती देण्यात यावी. या अनुषंगाने कर्जत-जामखेड, जि. अहिल्यानगर परिसरातील विविध रस्ते कामांचा पुढील १५ दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुका व परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्ते कामांबाबत आज विधानभवन येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

बैठकीत काष्टी, श्रीगोंदा, देऊळगाव, मांडवगण, डिकसळ, म्हाळसुंदा–निंबे, आळसुना–निंबे–आंबेजळगाव तसेच कोंभळी फाटा ते कोंभळी या प्रमुख मार्गांसह सर्व प्रलंबित रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने कामातील विलंबाबाबत जबाबदारी निश्चित करून प्रलंबित कामांची सखोल चौकशी करावी आणि आवश्यक त्या प्रशासकीय उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले. तसेच संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून रस्ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर द्यावा असेही सांगितले.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) संजय दशपुते, मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक नाशिक जी. मल्लीकार्जुन, अधीक्षक अभियंता विजय पाटील, कार्यकारी अभियंता अ. भा. चव्हाण, वनसंरक्षक विवेक होशिंग, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्र. शां. औटी, अधीक्षक अभियंता अहिल्यानगर विवेक माळुंदे, सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे आदी अधिकारी उपस्थित होते.

सभापती राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या श्री क्षेत्र चोंडीच्या विकासासाठी सर्वंकष आणि परिपूर्ण आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने विधानभवन येथे महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा तयार करताना पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) लक्षात घेऊन त्यामध्ये आवश्यक ते बदल व विस्तार करण्यात यावेत, अशा सूचना सभापती राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असल्याने यात्रेच्या वेळी एकावेळी किमान ५० ते ७० हजार भाविकांची सोय होईल, अशा पद्धतीने सर्वांगीण नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदेशातील जलसंवर्धन व वृक्षसंवर्धन या संकल्पनांचा विचार करून चोंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. यात सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय उभारणी, महादेव मंदिर व चौंडीश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार, भाविकांसाठी निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ तसेच स्थानिक उत्पादने व खाद्यपदार्थांसाठी बाजारपेठ निर्माण करण्यास प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला.

या विकास आराखड्यामुळे श्री क्षेत्र चोंडी हे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल, असा विश्वास सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केला.

ही बातमी पहा

सामान्य कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राज्यसभेची संधी; कोण आहेत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे? https://lokbhavanmarathinews.com/1033/dr-jyoti-waghmare/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!