राज्यसभेसाठी शिवसेना (शिंदे) कडून उमेदवारी दाखल करताना प्रा. डॉ. ज्योती वाघमारेशिवसेना (शिंदे गट) कडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रा. डॉ. ज्योती वाघमारे.

मुंबई : राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी शिवसेना (शिंदे गट) कडून मोठा राजकीय निर्णय घेत सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी त्यांचे नाव जाहीर करत राजकीय वर्तुळात धक्कातंत्राचा वापर केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गुरुवारी दुपारी एकनाथ शिंदे यांच्यासह प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या विधान भवनात दाखल झाल्या. यावेळी शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित होते.तसेच शिवसेना नेते गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, आमदार विजयबापू शिवतारे, अब्दुल सत्तार, अमोल खताळ, किरण सामंत, प्रा.मनिषा कायंदे, मुरजी पटेल उपस्थित होते. शिवसेनेच्या उमेदवार म्हणून त्यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

राज्यसभेच्या सात जागांसाठी भाजपकडून चार उमेदवार, शिवसेनेकडून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार आणि महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. सात जागांसाठी सातच अर्ज आल्यामुळे या निवडणुकीत सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या उच्चशिक्षित असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवातही अत्यंत उल्लेखनीय राहिली आहे. दहावीच्या परीक्षेत त्यांनी ८४ टक्के गुण मिळवले होते. बारावीच्या परीक्षेत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता.

तसेच अर्धमागधी विषयात राज्यात प्रथम येण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे. महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेल्या संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारही मिळाला आहे.

ज्योती वाघमारे यांची मातृभाषा तेलुगू असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या भाषांचेही उत्तम ज्ञान आहे. त्यामुळे त्यांना एकूण पाच भाषांवर प्रभुत्व आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व करताना त्यांच्या या भाषिक कौशल्याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील असून गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. विविध महाविद्यालयांमध्ये त्यांनी १० वर्षांहून अधिक काळ प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

शिवसेना पक्षातील ऐतिहासिक घडामोडीनंतर त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची शिवसेना राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मागील अडीच वर्षांत विविध चर्चासत्रे, राजकीय कार्यक्रम आणि सभांमध्ये त्यांनी शिवसेनेची भूमिका आक्रमक आणि मुद्देसूद पद्धतीने मांडली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांमधील त्यांच्या घणाघाती भाषणांमुळे त्या राज्यभर चर्चेत आल्या आहेत.

दलित समाजातील एका उच्चशिक्षित महिलेची राज्यसभेसाठी निवड करून सामान्य कार्यकर्त्यालाही पक्षात मोठी संधी मिळू शकते हा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधान आणि राज्यकारभार या विषयांवरील अभ्यासपूर्ण भाषणांमुळे प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन एकाच वेळी अनेक समीकरणं साधली आहेत. एक उच्चशिक्षित दलित महिला उमेदवार देऊन त्यांनी सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश दिला आहे. तसेच सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी वाघमारे यांचा उपयोग होऊ शकतो.

ही बातमी पहा

साकतचे भूमिपुत्र प्रा. अनिरुद्ध आडसुळ यांना ‘लोकआवाज जीवनगौरव पुरस्कार २०२६’जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान https://lokbhavanmarathinews.com/1015/pra-aniruddha-adsul-2/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!