साकतचे भूमिपुत्र प्रा. अनिरुद्ध आडसुळ यांना ‘लोकआवाज जीवनगौरव पुरस्कार २०२६’; जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)-सुनिल पुलवळे
अहिल्यानगर येथे ग्रामीण शिक्षण क्षेत्रात गेली २५ वर्षे मोलाचे आणि प्रभावी योगदान देणारे साकत (ता. जामखेड) येथील भूमिपुत्र प्रा. अनिरुद्ध आडसुळ यांना प्रतिष्ठेचा ‘लोकआवाज जीवनगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी सावेडी, अहिल्यानगर येथील माउली सभागृहात झालेल्या भव्य सोहळ्यात जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संग्राम जगताप होते. यावेळी महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, साहित्यिक डॉ. संजय कळमकर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच महापालिका आयुक्त यशवंत डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातून उभा राहिलेले शिक्षणाचा दीपस्तंभ-प्रा. अनिरुद्ध आडसुळ सर
श्री साकेश्वर महाराजांच्या पावनभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकत या छोट्याशा ग्रामीण गावातून आलेले प्रा. अनिरुद्ध आडसुळ सर यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील मर्यादित शैक्षणिक सुविधा, आर्थिक अडचणी आणि संधींचा अभाव यांसारख्या अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी शिक्षण हाच परिवर्तनाचा खरा मार्ग असल्याचा ठाम विश्वास जपला.
ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, त्यांच्या स्वप्नांना स्थानिक पातळीवरच दिशा मिळावी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांच्या दारात उपलब्ध व्हावे, या उद्देशाने त्यांनी ‘श्री साकेश्वर ग्रामीण शिक्षण संस्था’ स्थापन केली. ही संस्था उभारणे ही केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक चळवळच ठरली.
या संस्थेमुळे ग्रामीण भागात बी.एड., अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, व्यवस्थापन आदी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची संधी निर्माण झाली. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार शिक्षण मिळू लागले. परिणामी, ग्रामीण कुटुंबांतील मुला-मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची नवी उभारी मिळाली.
त्यांची शैक्षणिक पात्रता उल्लेखनीय आहे — बी.एस्सी. (भौतिकशास्त्र), एम.एस्सी. (गणित) आणि एम.बी.ए. (फायनान्स). गेली २५ वर्षे ते अहिल्यानगर येथील आडसुळ कोचिंग क्लासेसमध्ये अध्यापन करत असून हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर, अभियंता आणि विविध व्यावसायिक क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी आज देश-विदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत.
प्रा. आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उच्च शिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये –
- श्री. माणिक शंकर आडसुळ बी.एड. कॉलेज (अहिल्यानगर)
- सौ. सुंदरबाई माणिक आडसुळ पॉलिटेक्निक कॉलेज (अहिल्यानगर)
- आडसुळ टेक्निकल कॅम्पस (इंजिनिअरिंग व एम.बी.ए.) – चास
- आडसुळ बी & डी फार्मसी कॉलेज
- आडसुळ लॉ कॉलेज
- आडसुळ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट
- आडसुळ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज
- आडसुळ आर्किटेक्चर कॉलेज (चास)
या संस्थांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि व्यावसायिक शिक्षण जिल्ह्यातच उपलब्ध झाले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सामाजिक व आर्थिक विकास साधण्याचा त्यांचा ध्यास आज वास्तवात उतरलेला दिसतो.

उल्लेखनीय पुरस्कारांची मालिकाच
प्रा. अनिरुद्ध आडसुळ सर यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्थात्मक कार्याची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली असून, त्यांच्या योगदानाचा गौरव अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी करण्यात आला आहे.
प्रा. अनिरुद्ध आडसुळ यांना प्राप्त झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे –
- कै. लक्ष्मण रामचंद्र देशमुख पुरस्कार
- दिल्ली वेल्फेअर सोसायटीचा राजीव गांधी पुरस्कार
- सावर रुस्तम पुरस्कार
- दिव्य मराठी पुरस्कार (शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल)
- “सर्वोत्कृष्ट टेक्निकल कॅम्पस” पुरस्कार
- “डिस्टिंग्विश्ड इंजिनिअरिंग कॉलेज” पुरस्कार
याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम व्यावसायिक महाविद्यालय पुरस्काराने त्यांच्या संस्थांचा गौरव करण्यात

साकत गावासाठी अभिमानास्पद गोष्ट
‘लोकआवाज जीवनगौरव पुरस्कार २०२६’ हा सन्मान प्रा. अनिरुद्ध आडसुळ सर यांच्या आयुष्यभराच्या अखंड, निष्ठावान आणि समर्पित शैक्षणिक सेवेला मिळालेली मोठी दाद मानली जात आहे. ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित ठेवत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या त्यांच्या कार्याचा हा योग्य गौरव असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
साकतसारख्या ग्रामीण गावातून उभा राहिलेले एक शिक्षणतज्ज्ञ राज्यस्तरावर सन्मानित होणे ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या पुरस्कारामुळे साकत गावासह जामखेड तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

प्रा. अनिरुद्ध आडसुळ सर यांनी केवळ शिक्षण संस्था उभारल्या नाहीत, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर, अभियंता, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि उद्योजक म्हणून यश संपादन केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा प्रभाव केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित न राहता सामाजिक व आर्थिक उन्नतीपर्यंत पोहोचला आहे.
त्यांची दूरदृष्टी, प्रामाणिकता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे ते ग्रामीण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत. येणाऱ्या पिढ्यांसाठी ते खऱ्या अर्थाने मार्गदर्शक दीपस्तंभ बनले असून, शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळत आहे.

ही पण बातमी पहा
CIDCO Lottory 2026 Update: सिडकोच्या १६,८७६ घरांसाठी पर्याय निवडीची अंतिम मुदतवाढ १९ मार्च २०२६ पर्यंत https://lokbhavanmarathinews.com/951/cidco-lottory-2026-update/

